मुंबई : मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. यातच ठाकरे बंधूंची युती, काँग्रेसचा स्वबळाचा नारा आणि महाविकास आघाडी सर्व ठिकाणी एकत्र लढणार का, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच एका निवडणुकीत महाविकास आघाडीनेमनसेला सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे.
महापालिका निवडणुकीत बहुतेक ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. विविध महापालिकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची बैठक २५ डिसेंबरला मुंबईत होणार आहे. त्या दिवशी बहुतेक उमेदवार नक्की केले जातील. कोणत्या पक्षाशी युती करायची याचे अधिकार प्रदेश काँग्रेसने स्थानिक पातळीवर दिले आहेत. निधीची चणचण भासत असलेल्या या पक्षाला निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच करा, असे सांगण्याची वेळ आली आहे.
भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र
वसई-विरार महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. यासाठी महाविकास आघाडीने बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मनसेलाही महाविकास आघाडीत घेण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. मतविभाजन होऊन दोन्ही पक्षांचा पराभव झाला आणि महायुतीने तीनही जागा जिंकल्या. त्यामुळे वसई विरार पालिकेत भाजपाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने पालिका निवडणूक एकत्र लढविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी बुधवारी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.
आम्ही मनसेला महाविकास आघाडीत घेत आहोत
काँग्रेसचे विजय पाटील, जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर आता आम्ही एकत्र लढू, असेही हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले. मनसेलाही महाविकास आघाडीने येथे सोबत घेण्याचे ठरविले आहे. आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. येथील परिस्थितीनुसार आम्ही मनसेला महाविकास आघाडीत घेत आहोत, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्वी प्रदेश काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात 'रसद' पोहोचविली जायची. मात्र, आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षात जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नेते आहेत ते आपापल्या प्रभावक्षेत्रात खर्चाची जबाबदारी उचलतात. प्रदेश काँग्रेससाठी म्हणून पूर्वी ज्या पद्धतीने राज्यातील मोठे नेते मदत करायचे ते आता जवळपास बंद झाले आहे. प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, असे असले तरी प्रदेश काँग्रेसकडून काही प्रचारसाहित्य प्रत्येक महापालिकेतील काँग्रेस उमेदवारांना पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.